गुरुचरणाची
आस लागियेली
निशीदिनी स्मरली
सद्गुरू माऊली

सद्गुरू माऊली
कृपावंत व्हावे
दर्शन घडावे
मज पामरासी

मज पामरासी
भवाब्धी तरावे
मस्तकी ठेवावे
वरदहस्त

वरदहस्ते
असे घडवावे
न्हाउनी निघावे
आनंदाचे डोही

आनंदाचे डोही
शुचिर्भूत व्हावे
एक संघ व्हावे
मन चित्त बुद्धी

मन चित्त बुद्धी
एकवटो यावे
उदास वाटावे
ध्यान इतराचे

ध्यान इतराचे
समूळ गळावे
अंतरी वळावे
वृत्तीच्या धारा

वृत्तीच्या धारा
डोही मिसळावे
आनंदची व्हावे
सबाह्य-अंतरी

सबाह्य-अंतरी
द्वैत न रहावे
तादात्म्य पावावे
गुरुचरणाशी

[social_warfare]