नामस्मरणाचे महत्त्व सांगताना महाराज नेहमी रामायणातील सेतु बांधण्याच्या प्रसंगी घडलेल्या दोन घटना सांगतात.
त्या घटनांवर एक कविता लिहिली आहे. श्रीजी त्या प्रसंगांविषयी जे जे वर्णन करतात ते शक्य तितके समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीजींच्या चरणी सादर अर्पण

जय श्री राम जय जय श्री राम
तीरावर जयघोष चालला
जयघोषे पाषाणां सहजचि
सागरात वानरे टाकला

विशाल ऐशा तरिल्या शिळा
नामप्रतापे सागरजलवर
पाहत होते राम दृश्य हे
दूर बसुन एका खडकावर

इतकी प्रचंड वानर सेना
एकजुटीने बांधीत सेतू
इवलीशी ती खार भाबडी
वाटा उचलित रामा हेतू

मनात आले श्री रामाच्या
हातभार थोडा लावावा
झटती सारे अपुल्या कार्या
आपणही भारा उचलावा

ठरवुनि ऐसे उठले राघव
आले निश्चये सेतु स्थानी
उचलति फेकति महासागरी
दगड एक दोन्ही हातांनी

गुडगुडगुडुंब दगड डुंबला
चकित जाहले सारे क्षणभर
प्रयत्न आणिक करण्या पुढती
चटकन सरसावले रघूवर

दुसरा, तिसरा, कितीतरी ते
दगड बुडाले राम करांतुन
हताश होऊन माघारी प्रभु
खडकावरती बसले जाऊन

काही कळेना काय करावे
कोडे हे कोणास पुसावे
बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ ऐशा
हनुमंताला असेल ठावे

बोलावुनि त्यां कथिती राघव
घडला प्रसंग, पुसती कारण
वदले हनूम “दगड फेकतां
म्हटले का “जय श्री राम” आपण?”

नाही? मग कैसे हो तरावे
दगड रामनामाविण एकही
आणि प्रभु ज्यां तुम्ही सोडिले
बुडती निश्चिती ते जलडोही

पलीकडे लंका तीरावर
रावणसेना होय घाबरी
मायावी हे वानर दिसती
सेतू बांधती समुद्रावरी

धीर राखण्या निज सेनेचा
लंकापती तो रावण आला
महाकाय दगडा उचलुनिया
पाण्यावरती सहज तारिला

रावणांस निक्षून विचारी
मंदोदरी ती राजमहालां
हे तुमचे सामर्थ्यच नोहे
चमत्कार हा कसा घडविलां

रावण सांगे गुपित पत्निला
टाकित असता जळांत पत्थर
मनात मी चालविला होता
रामनाम जयघोष निरंतर
रामनाम जयघोष निरंतर

[social_warfare]