श्री माणिकचरितामृताचे श्रवण, मनन आणि निदीध्यासन करताना चित्तशुद्धी तर होतेच, त्यातील अनेक पात्रे आपल्याभोवती रुंजी घालत राहतात. त्या त्या पात्रांच्या संदर्भात घडलेल्या लीला, त्यातून श्रीप्रभुंनी केलेला निजात्मबोध किंवा त्या लीलेचे उलगडलेले रहस्य जाणून, आपल्या जगण्याचा मार्ग प्रशस्त होत राहतो. श्रीप्रभु चरितामृताचे घुटके घेताना, श्रीदेवी व्यंकम्मा मातेची स्थितप्रज्ञता आणि तिची श्रीप्रभु चरणांवर असलेली अचंचल श्रद्धा, आपल्या हृदयात खोलवर घर करून राहते.
तेविसाव्या अध्यायात कोमटी जातीची, अगदी बालवयांतच वैधव्य पदरी पडलेली, व्यंका बाला आपल्यासमोर येते. श्रीप्रभुंच्या दर्शनाला येत असताना, अवकाळी पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेला संपूर्ण परिवार, पुराच्या पाण्यात बुडत असताना कुणीतरी हात देऊन पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर ठेवलेले, सोबत कुणीही नाही, काय करावे? कुठे जावे? भविष्यात काय वाढून ठेवलाय, याची सुतराम कल्पना नसलेली, व्यापारशून्य झालेली इंद्रिये घेऊन, अवघ्या अकरा वर्षाची ही बालविधवा पोर मैलार येथे श्रीप्रभुंच्या दरबारात येते. मध्यभागी गादीवर बसलेल्या श्रीप्रभुंना पाहून आपल्याला पाण्यातून वाचविणारा हाच तो! हाच मला आता भवसागरातूनही तारेल, अशी व्यंकम्माची मनोमन खात्री पटते. एका कोपऱ्यात बसून तासान तास, नंदी जसा शिवाला पाहतो, तसे एकटक श्रीप्रभुंकडे पाहत बसावे, त्याच आत्मानंदात तृप्त असावे, श्रीप्रभुंच्या दिव्यरूपाशी तासन् तास अनुसंधान साधावे, एवढेच व्यंकम्माला माहीत होते. श्रीप्रभुंच्या प्रसादाची काळजी नाही, की श्रीप्रभु चरणांवर मस्तक ठेवायची इच्छा नाही, देहाची पर्वा नाही, अथवा काही मागणे नाही, केवळ आणि केवळ अनिमिष नेत्रांनी श्रीप्रभुंचे नि:श्चल ध्यान, त्यातच तीचे समाधान! कुण्या शिष्याने हटकल्यावर भानावर येऊन व्यंकम्माने श्रीप्रभुंकडून खारकांचा प्रसाद घेतला आणि बाहेर गेली. दोन-तीन दिवसांनी व्यंकम्मा पुन्हा श्रीप्रभु दरबारी आली. त्यावेळी श्रीप्रभुंनी पुन्हा येण्याचे कारण विचारताच, माझे या जगात कोणीही नसून, अंतरीची तळमळ शांत होण्यासाठी आपल्या परममंगल चरणांशिवाय अन्य कुठलेही स्थळ नाही, हे तिने श्रीप्रभुंना अत्यंत निश्चयपूर्वक सांगितले आणि आपल्याला आसरा देण्यासाठी विनंती केली. परंतु आम्ही फकीर, आमच्याबरोबर राहावयाचे, तर अंगावरचे सर्व दागिने उतरावे लागतील, प्रसंगी भुके राहावे लागेल, अंगाला भस्म फासून राहावे लागेल, असे सांगून श्रीप्रभुंनी व्यंकम्माची पहिल्यांदा परीक्षा पाहिली. परंतु श्रीप्रभु चरणांवाचून अन्य तरणोपाय नाही, हा दृढनिश्चय झालेल्या व्यंकम्माने तात्काळ आपले दागिने उतरवून, अंगी शुभ्र वस्त्र धारण केले आणि कपाळी भस्म चर्चिले, ते जीवनभरासाठीच! श्रीप्रभुंची आज्ञा ही ‘शब्दप्रमाण’ मानून, त्याची जपणूक व्यंकम्माने अगदी प्राणपणाने आजीवन केली. अगदी न्हाणीघरात स्नान करत असताना, ‘असशील तशी निघून ये!’ हा श्रीप्रभुंचा निरोप मिळताच, स्त्रीलज्जेचे भानही न राहता, व्यंकम्मा तशीच नग्न अवस्थेत श्रीप्रभुंकडे धावत निघाली. आपल्या भक्ताचे हे निर्व्याज प्रेम पाहून, तिची तत्परता पाहून श्रीप्रभुंनी आपल्या अंगावरील दुशाला व्यंकम्माला प्रसाद म्हणून लज्जा रक्षणासाठी दिला. श्रीप्रभुंच्या या महावस्ररूपी प्रसादाने व्यंकम्माचे अवघे जीवनच बदलून गेले. ती वृत्तीने नि:संग झाली. आपल्या विरक्त जीवनशैली आणि साधनेने तिने लवकरच श्रीप्रभुंचा विश्वास आणि कृपा संपादन केली. माणिकनगरची स्थापना आणि तेथे कायमचे वास्तव्य करण्यापूर्वी श्रीप्रभु अनेक ठिकाणी भ्रमंती करीत. आपल्याबरोबर चार विश्वासू शिष्य बरोबर ठेवीत. अल्पावधीतच व्यंकम्माने ती योग्यता प्राप्त केली आणि श्रीप्रभुंनी आपल्या मणिचूल पर्वतातील एकांतवासात काही निवडक शिष्याबरोबर व्यंकम्मालाही सोबत घेतले. भालकीच्या घोर अरण्यात श्रीप्रभु व्यंकम्मासहित आपल्या शिष्यांसमावेत आठ आठ दिवस समाधी लावून बसत. याच एकांतवासादरम्यान श्रीप्रभुंनी व्यंकम्मास योगासने आणि समाधी कशी लावावी, हे शिकविले! एका सामान्य बालिकेपासून योगिनी बनण्याचा व्यंकम्माचा प्रवास आता श्रीप्रभुंच्या सान्निध्यात प्रशस्त होत होता.
बिदरच्या मुक्कामात असताना, सर्व जातीच्या भक्तांनी श्रीप्रभुंना आपापल्या घरी येऊन पूजा स्वीकारण्याचा आग्रह केला. त्यावेळेस सर्व भक्तांना श्रीप्रभुंनी मी उद्या माध्यान्हसमयी आपणाकडे येतो, असे आश्वासन दिले. माध्यान्ह समयी सूर्य डोक्यावर आला, तरी झरणी नृसिंहाच्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी श्रीप्रभु स्वस्थ पडून होते. सर्व भक्तांमध्ये बिदरनगरामध्ये पाद्य पूजेसाठी जाण्यासंदर्भात चलबिचल सुरू झाली. श्रीप्रभु अजूनही उठले नाहीत, म्हणून कुजबुज सुरू झाली. व्यंकम्मा मात्र एका कोपऱ्यात स्वस्थ बसून श्रीप्रभु नामाचा जप करीत होती. त्याचवेळी श्रीप्रभुंनी योगमायेने विश्वरूप धारण करून एकाच वेळी अनेक भक्तांच्या घरी पूजा स्वीकारल्या. थोड्यावेळाने सर्व भक्त पुन्हा श्रीप्रभुंकडे येताच, श्रीप्रभुंच्या योगशक्तीचा उलगडा झाला. अशावेळी शिष्यांमध्ये जरी चलबिचल होती, तरी व्यंकम्मा मात्र त्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहिली.
टेहेळदास नावाचा श्रीप्रभुंचा एक अभिमानी भक्त होता.व त्याची माता साधारणत: सव्वाशे वर्षांची होती. श्रीप्रभु कधीकधी तिच्या भेटीसाठी तिच्या झोपडीत जात. एके दिवशी श्रीप्रभु टेहेळदासाच्या आईच्या झोपडीत तिच्याशी सुखसंवाद करीत असता, एकाएक झोपडीला आग लागली. त्या आगेच्या प्रभावाने बाजूच्या झोपड्यांनीही पेट घेतला. सगळीकडे एकच आगडोंब उसळला. श्रीप्रभु आगीमध्ये सापडले, ही वार्ता संपूर्ण माणिकनगरात पसरली. सर्वत्र एकच हाहाकार माजला. सर्व लोकांप्रमाणे श्रीप्रभुंचे बंधूही आग विझविण्यासाठी सरसावले. या प्रचंड आगीमध्ये टेहेळदासाच्या आईसहित श्रीप्रभुही आगीच्या भक्षस्थानी पडले असावेत, अशी शंका, ती भयंकर आग पाहून, अनेक लोकांच्या मनात आली. या हलकल्लोळातही व्यंकम्मा मात्र प्रलयकाळातही स्थिर असणाऱ्या एखाद्या योग्याप्रमाणे श्रीप्रभुगादी जवळ बसून निजानंदात निमग्न झाली होती. पंचमहाभूतांवर सत्ता असणाऱ्या निरालंब, निर्गुण, निरंजन, परिपूर्ण अशा श्रीप्रभुला अग्नी बाधा तो काय करू शकणार? असा ठाम विश्वास केवळ व्यंकम्माच्या ठायींच होता आणि म्हणूनच ती आपल्या जागी स्वस्थचित्त राहिली.
श्री हनुमंत दादा महाराज, मातोश्री श्री बयांमादेवी आणि श्रीनृसिंह तात्या महाराजांची समाधी झाल्यावर, आपणही श्रीप्रभुंच्या आधी समाधीस्थ व्हावे, ही व्यंकम्माची इच्छा होती. आणि श्रावण वद्य त्रयोदशीची मंगलवेळा साधून, अहोरात्र भजनात घालवून, देवी व्यंकम्मा निश्चेष्टित होऊन पडली. व्यंकम्माचे निर्वाण झाले, असे समजून तिच्या कोमटी जातीच्या लोकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. परंतु तिला हात लावताच, तिच्या तोंडातून ॐकार ध्वनी ऐकू येई. जिवंतपणाचे कोणतेही लक्षण व्यंकम्मात दिसत नव्हते. परंतु कोमटी लोकांनी हात लावताच तिच्या देहातून ॐकार ध्वनी ऐकू येई. त्यावेळेस व्यंकम्माचे अंतःकरण श्रीप्रभुंनी तात्काळ ओळखले. आपला अंत्यसंस्कार वैदिक पद्धतीने व्हावा, अशी तिची इच्छा असल्याचे श्रीप्रभुंनी सर्वांना सांगितले. त्याप्रमाणे श्रीप्रभुंच्या सेवेकरी ब्रह्मवृंदाकडून व्यंकम्माच्या अंत्यसंस्काराची तयारी केली गेली. प्रथमत: स्नान घालून, व्यंकम्मास शुभ्र चोळीपातळ नेसविण्यात आले. सर्वांगाला भस्म चर्चिले गेले, कपाळी शुभ्र गंधाचा टिळा आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घातल्या गेल्या. त्यावेळी व्यंकमा एखाद्या निर्मळ योगिनीप्रमाणे भासत होती. श्रीप्रभु आपल्याजवळ असल्याचे जाणून, व्यंकम्मा आपल्या जागेवरून उठली, तिने श्रीप्रभुंना अत्यंत मनोभावे नमस्कार केला. श्रीप्रभुंचे चरण घट्ट पकडले आणि पुन्हा मांडी घालून व्यंकम्मा योगासनात बसली, ती कायमचीच! व्यंकम्माच्या समाधीनंतर तिचे मंदिर बांधावे किंवा कसे, अशी विचारणा करताच श्रीप्रभु म्हणाले, ‘तिच्या सामर्थ्याने तीच आपले मंदिर उभारून घेईल!’ परमविदुषी श्रीदेवी व्यंकम्माचे भव्य मंदिर आजही आपल्याला माणिकनगरी पहावयास मिळते. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी, श्रीदेवी व्यंकम्मा ही श्रीदत्तात्रयांची मधुमती शक्तीच आहे, अशी मान्यता सर्व भक्तांमध्ये आहे. नराचा नारायण होणे म्हणजे नेमके काय, हे आपल्याला स्थितप्रज्ञ, श्रीप्रभु चरणांवर अचंचल श्रद्धा आणि श्रीप्रभु वचनांवर अढळ विश्वास असणाऱ्या, श्रीदेवी व्यंकम्माच्या चरित्रातून अनुभवता येते. या सद्गुणांच्या जोरावरच कोमटी जातीतील एक सामान्य व्यंका बालिका अखेरीस श्रीदेवीपदास पोहोचली.
विश्वपालिनी जगदंबे की जय!!!
श्री मधुमती शामलांबा माते की जय!!!
श्री व्यंकम्मा देवीचा उदो उदो!!!
Recent Comments