प्रभुसेवेचा अखंड वारसा

आमचे श्री माणिकप्रभु संस्थानशी अतूट नाते आहे आणि ते जोडण्यास श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु महाराजांच्या सगरोळी दौऱ्याचे निमित्त घडले. माझे वडील श्री बापूराव सगरोळीकर त्या वेळी तरुण होते. श्री महाराजांनी सगरोळीहून माणिकनगरला परतताना उत्साही व होतकरू बापूस “माझ्या बरोबर माणिकनगरला येशील का?” असे विचारताच क्षणाचाही विचार न करता माझ्या वडिलांनी “हो, येतो महाराज” असे तत्परतेने उत्तर दिले. एकदा ते माणिकनगरला आले आणि माणिकनगरचेच झाले. श्रीजींनीच आपल्या देखरेखीखाली माझ्या वडिलांचे शिक्षण पूर्ण करविले, संस्कार घडविले, लग्न लावून संसार थाटून दिला व श्री संस्थानच्या कारभारात रुजू करून घेतले.

श्री सद्गुरु शंकर माणिकप्रभु महाराज पीठारूढ झाल्यावर बापूराव हे त्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख झाली. माझे व माझ्या बंधु-भगिनींचे जन्म माणिकनगरातच झाले व आम्ही प्रभुमंदिराच्या परिसरात खेळत-खेळतच मोठे झालो. जेव्हां आमच्या वडिलांचा हैदराबाद येथे सरकार-दरबारी चांगला जम बसला तेव्हां श्री शंकर माणिकप्रभूंची हैदराबादची सगळी कामे बापुराव यशस्वीरीत्या करतात अशी ख्याती झाली. माझ्या वडिलांनी आपले संपूर्ण जीवन श्रीप्रभूंच्या सेवेतच खर्च केले.

पुढे शामराव या नावाने माझी वाटचाल सुरू झाली. श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांच्या कारकीर्दीतही आमच्या घरण्याची प्रभुसेवा वृद्धिंगत होत राहिली. श्रीजींच्या आज्ञेवरून ई. स. १९६५ सालच्या दत्तजयंती पासून दरवर्शी उत्सवाच्या लेखा विभागाची सेवा माझ्याकडे आली. ही सेवा प्रभुकृपेने ५५ वर्षांपासून आजतागायत चालू आहे. श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांचीही आमच्या घराण्यावर विशेष कृपादृष्टी आहेच. श्री प्रभुकृपेने श्री संस्थानच्या तीन पीठाधीशांची (श्री शंकरप्रभु, श्री सिद्धराजप्रभु व श्रीज्ञानराजप्रभु) कारकीर्द पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. या काळात श्रीसंस्थानची होत असलेली सर्वतोमुखी अभिवृद्धि पाहून कै. श्री बाबासाहेब महाराजांचे स्वर्णिम स्वप्न साकार होत असल्या सारखे वाटते.

श्री प्रभूंच्या कृपाछत्राखालीच आमच्या परिवाराची आजही वाटचाल ‌सुरु आहे. प्रभुशी ऋणानुबंध आहेत याची रोज अनुभूती मिळते. अशीच सेवा आमच्या घराण्याकडून निरंतर घडत राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना.